Thursday, 21 June 2012

इ-मेल

ई-मेल म्हणजे काय?

ई-मेल चे पुर्ण नाव इलेक्ट्रॉनिक मेल (Electronic mail). ई-मेल म्हणजे म्हणजे कॉम्प्युटरद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा पत्रव्यवहार. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपण आपली पत्रे म्हणजेच ई-मेल साठवू शकता (save), त्यांना प्रत्युत्तर देणे (reply) तसेच ते दुसऱ्यांना पाठविणे (forward) या गोष्टी येतात. ई-मेल हा इंटरनेटवरील नेटवर्कद्वारे एकमेकांना जोडलेल्या सर्व्हरद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविला जातो.
ई-मेलमध्ये १) ई-मेल पाठविणाऱ्याचा ई-मेल पत्ता, २) ज्याला ई-मेल पाठवायचा असेल त्याचा ई-मेल पत्ता, ३) विषय, ४) ई-मेल चा मजकूर (body) या चार गोष्टी प्रामुख्याने काम करतात. ई-मेल च्या निर्मितीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त याच चार गोष्टींपुरता मर्यादित असलेल्या ई-मेलमध्ये नंतर निराळी अतिरीक्त फाईल जोडण्याची (attachment) सेवा देखिल जमा झाली.
थोडक्यात आपण ज्याप्रकारे कागदावर पत्र लिहून ते पाकिटामध्ये भरुन त्यावर ज्याला पत्र पाठवायचे असते त्याचा पत्ता लिहून ते पाकिट पोस्टामध्ये देतो मग ते आपले पत्र असलेले पाकिट ३-४ दिवसांमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला मिळते. अगदी त्याच प्रकारे पण अतिशय जलद, सोपे, सुरक्षित पत्र पाठविण्याचे सध्याचे माध्यम म्हणजे ई-मेल.
ई-मेल ही एक कॉम्प्युटरद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून पत्र पाठविण्याचे सेवा आहे. आपल्याला जर कुणाशी फोनवर बोलायचे असेल तर ज्याप्रमाणे आपल्याकडे फोन असणे आवश्यक आहे. तसेच ज्याला फोन करायचा असेल त्याच्याकडे देखिल फोन असून त्याच फोन क्रमांक आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे आपल्याला जर कुणाला ई-मेल पाठवायचा असेल तर आपल्याल प्रथम आपला ई-मेल तयार करावा लागेल, नंतर मग आपण आपल्या ई-मेल खात्यामधून दुसऱ्याच्या त्याच्या ई-मेल पत्त्यावर ई-मेल पाठवू शकता. यासाठी आपल्याला त्या दुसऱ्याचा ई-मेल पत्ता माहित असणे आवश्यक आहे.
सध्या ई-मेल ही एक मोफत सेवा आहे. जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या सारख्या वेबसाइट आपल्याला आपला मोफत ऑनलाईन ई-मेल देतात. मग आपण त्यांच्या वेबसाइटद्वारे आपले ई-मेल पाहू शकतो तसेच इतरांना ई-मेल पाठवू शकतो. ऑनलाईन ई-मेल म्हणजे आपण जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ वेबसाइटद्वारे जगभरातून कुठूनही आपले ई-मेल खाते वापरु शकता. (टीप: अशाप्रकारे मोफत ई-मेल सेवा देणे म्हणजे जाहिरातीद्वारे उत्पन्न हे त्यामागचे कारण असते.)
जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या प्रमाणे जगभरामध्ये मोफत ऑनलाईन ई-मेल सेवा देणाऱ्या शेकडो वेबसाइट आहेत. परंतू भारतामध्ये या चार वेबसाइट प्रसिद्ध आहेत. आपण ज्या वेबसाइटवर आपला मोफत ई-मेल चालू करता तेव्हा आपल्या ई-मेल पत्त्यामध्ये त्या-त्या वेबसाइटचे नाव मागे दिलेले असते. उदा. समजा सचिन पिळणकर व आपला ई-मेल याहू या वेबसाइटवर असेल तर आपला ई-मेल पत्ता example@yahoo.com असा असेल वर जर आपला ई-मेल हॉटमेलवर या वेबसाइटवर असेल तर आपला ई-मेल पत्ता  example@hotmail.com असा असेल.
प्रत्येक ई-मेल मध्ये @  हे चिन्ह वापरलेले असते. या चिन्हाद्वारे ई-मेल वापरणाऱ्याचे नाव आणि ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइटचे नाव विभागले जाते. जसे  example@gmail.com  या ई-मेलमध्ये  example हे वापरलेले नाव ज्यालाच युजरनेम असे देखिल म्हणतात, तर gmail.com हे ई-मेल सेवा देणाऱ्या वेबसाइटचे नाव ज्याला होस्टनेम (host name) असे म्हणतात.


फाईल अटॅच कशी करावी?

ई-मेलमध्ये एखादी फाईल अटॅच करणे तसे फारसे कठीण नाही. सर्वच ई-मेलची सेवा देणार्‍या संकेतस्थळांवर आपल्या ई-मेल सोबत इतर कोणत्याही फाईल्स पाठविण्याची देखिल सोय असते. ज्याला ' अटॅचमेंट (Attachment) ' असे म्हटले जाते.
आपण या ' अटॅचमेंट (Attachment) '  च्या लिंक वर क्लिक करुन आपली फाईल ई-मेलला ' अटॅच ' करु शकता म्हणजेच जोडू शकता. यामूळे आपण ज्याला ई-मेल पाठवित आहात त्याला आपल्या ई-मेल सोबत आपण जोडलेली फाईल देखिल पाठविली जाते.
आपण एकापेक्षा जास्त फाईल्स देखिल ई-मेलमध्ये जोडू शकता. असे असले तरी आपण जोडत असलेल्या म्हणजेच 'अटॅच ' करीत असलेल्या एकूण फाईलची साईज मर्यादित असते. म्हणजे साधारण १० ते २० एम्बी (Mega Byte)  पर्यंत साईज च्या पलिकडील जास्त फाईल्स आपण ई-मेलद्वारे पाठवू शकत नाही.


स्पॅम ई-मेल म्हणजे काय?

इंटरनेटरनेटवर सध्या ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाण वाढल्याने. ई-मेल हा एक जाहिरातीचा भाग म्हणून देखिल वापरला जाऊ लागला आहे. सध्या अनेक लहान-मोठ्या कंपन्या आपल्या कंपनीची अथवा वस्तूची जाहिरात करण्यासाठी ई-मेलचा वापर करु लागल्या आहेत.
ई-मेलद्वारे केल्याजाणाऱ्या जाहिरातीला खर्च फारच कमी (जवळजवळ नाहीच) येतो. तसेच फार कमी वेळामध्ये आपण आपली जाहिरात ई-मेलद्वारे शेकडो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.  स्वतःच्या फायद्यासाठी अनेकांना आपली जाहिरात मोठ्याप्रमाणात पाठवून त्यांना त्रास देण्याचाच हा प्रकार कारण अशा लोकांना नको असताना उगाच इतरांच्या जाहिराती पाहण्यात वेळ फुकट जातो. अशाप्रकारे नको असलेल्या आणि विनाकारण इतरांचा वेळ फुकटा घालविणार्‍या ई-मेलला ' स्पॅम ई-मेल ' असे म्हणतात.
स्पॅम ई-मेल चा त्रास सर्वांनाच असल्याने सध्या सर्वच ई-मेल सेवा देणारी संकेतस्थळे स्पॅम ई-मेलचा न व्हावा यासाठी खास ' स्पॅम ई-मेल फिल्टर ' ची अतिरीक्त मोफत सेवा आपल्या ई-मेलमध्ये देतात. यामध्ये आलेला प्रत्येक ई-मेल तपासला जातो ज्याद्वारे तो ई-मेल जाहिरातीच्या उद्देशाने पाठविला आहे का? म्हणजेच त्यामध्ये एखाद्या ठराविक गोष्टीची माहिती अथवा जाहिरात देण्यात आली आहे का हे पाहिले जाते. आणि जर त्यांना अशाप्रकारे जाहिरातीचा आशय ई-मेलमध्ये आढळल्यास त्या ई-मेलला लगेचच ' स्पॅम ई-मेल फोल्डर '  मध्ये पाठविण्यात येते. जेणेकरुन नको असलेला एखादा ई-मेल आढळल्यास अथवा वाटल्यास त्यामूळे इतरांना त्रास होवू नये.
आपण ' स्पॅम ई-मेल फोल्डर ' मध्ये आपल्याला आलेले ' नको असलेले '  ई-मेल पाहू शकतो. पण जर त्यातच एखादा ई-मेल आपल्याला हवा असेल तर त्याला स्पॅम ई-मेल फोल्डर मधून पून्हा इनबॉक्स मध्ये घेवू शकतो.

0 comments:

Post a Comment